परिसर मुक्त ज्ञान

चला वाचवूया जीवसृष्टी

निसर्गरंग  



🌹चला वाचवूया जीवसृष्टी 🌹

       - सरपटणारे प्राणी - साप , नाग

बालमित्रमैत्रिणींनो नागपंचमीला आपण नागाची पूजा करतो. पण आज आपण पूजा करण्याऐवजी त्यांना समजून घेऊया.

सांगा बरं , साप , नाग यांच्याविषयी तुम्हांला काय माहित आहे ?
१) साप , नाग माणसाला चावतात.
२)साप दूध पितो
३)तो पुंगीच्या तालावर डोलतो
४)केवडा सारख्या सुगंधी झाडावर येतो
५) साप डुख धरतो
यासारखे अनेक गैरसमज आज प्रचलित आहेत. तर चला खरी परिस्थिती काय आहे ते जाणून घेऊया.

माहिती - जगाच्या पाठीवर अंटार्क्टिक प्रदेश वगळता साप सर्वत्र आढळतात. भारतात २७५ प्रकारचे सर्प आढळतात. त्यापैकी ६० विषारी तर उर्वरित २१५ बिनविषारी आहेत.

साप हा सरपटणारा थंड रक्ताचा प्राणी आहे. साप आपल्या सावजाची शिकार शक्यतो रात्री करतात. ते शिकार चावून न खाता जबडा रुंद करुन गिळतात. एकदा शिकार केल्यावर एक दोन आठवडे त्यांना अन्नाची गरज पडत नाही. विषारी सापाचे पुढचे दात पोकळ असतात. त्याद्वारे ते सावजाच्या शरीरात विष सोडतात. हे दात तुटले तर परत येतात.
सापांना पापण्या नसतात. एक पारदर्शक पडदा संरक्षणासाठी असतो. त्वचेद्वारे आजूबाजूच्या परिस्थितीची चाहूल घेतात. म्हणून काठी जमिनीवर आपटल्यास किंवा माणसाच्या जमिनीवर चालत जाण्याचा त्यांना अंदाज येतो. साप जिभेद्वारे वास घेतात. म्हणूनच ती सतत लवलवत असते. सापांच्या खवल्यांच्या संख्येवरुन प्रकार ओळखतात. साप ठराविक कालावधीनंतर आपली कातडी बदलतो. यालाच कात टाकणे म्हणतात. प्रजननासाठी काही साप अंडी घालतात तर काही पिल्लांना जन्म देतात.
नाग ,स्वभावतःच भित्रा असतो. साप , नाग आपण होऊन माणसांवर हल्ला करत नाहीत. जर धोका वाटला तरच स्वसंरक्षणासाठी चावतात. इतरवेळी ते मनुष्यापासून लांबच राहतात.
साप शाकाहारी अन्न घेत नाही. त्यामुळे दूध पित नाहीत.
सापाला कान नसतात. त्यामुळे ते ऐकू शकत नाहीत. ते हलणार्या वस्तूवर लक्ष ठेवतात. म्हणून पुंगीच्या हालचाली प्रमाणे डोलतात.
केवडा सारख्या झाडांवर उंदीर येतात. म्हणून तिथे साप येतात.
आता आपले गैरसमज दूर झाले ना.
चला आता आपण त्यांचे महत्त्व पाहू या.

महत्त्व -
साप हा निसर्गमित्र आहे. अन्नसाखळीत त्याचे विशेष महत्त्व आहे. तसाच तो मानवमित्र म्हणजेच शेतकऱ्यांचाही मित्र आहे. कारण सापाचे मुख्य अन्न आहे उंदीर. शिवाय पिकांवरील कीटक , डासांच्या अळ्या ,घुशी यावर नियंत्रण ठेवतो. एक धामण वर्षात शेकडो उंदीर , घुशी खाते.
परंतू आपल्या अंधश्रद्धेला आणि चुकीच्या वागणुकीला हे प्राणी बळी पडतात. परिणामतः यांची संख्या कमी होत चालली आहे. सापांची हत्या करुन त्यांची कातडी , विष बाहेर विकले जाते. जंगलतोड आणि गवताळ प्रदेश नसल्यामुळे यांचे निवारे नष्ट होत चालले आहेत. बरेचवेळा तर नीट अन्न न मिळाल्याने ते मरतात.

मग आता आपली जबाबदारी काय आहे ते पाहू या.

साप दिसल्यास तातडीने सर्पमित्रास बोलवा.
त्यांना घालविण्यासाठी लांब काठीचा वापर करा . शक्यतो मारु नका.
सर्पदंशावरील प्रथमोपचार माहित करुन घ्या.
शिल्लक राहिलेले अन्न घराबाहेर टाकू नका. कारण ते खायला उंदीर , घुशी येतात. त्यामुळे त्यांना खाण्यासाठी साप येतात. आजूबाजूची बिळे बूजवा.
घराजवळ कशाचाही ढीग साठवू नका.
झाडे , वेली घरापासून थोडे दूर लावा.

तुम्हांला माहित आहे का वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ नुसार साप पकडणे , बाळगणे , ठार करणे हा गुन्हा आहे.

उपक्रम -
पुस्तके तसेच इंटरनेटवर सापांविषयी माहिती मिळवा आणि वाचा.
सापांविषयीचे इतरांचे गैरसमज दूर करा.
या जीवसृष्टीला वाचविण्यासाठी अजून काय करता येईल ते उपाय वहीत लिहा.
चला तर मग या नागपंचमीला साप , नाग यांच्याविषयी कृतज्ञता बाळगून नागपंचमी साजरी करु या. सर्वांना नागपंचमीच्या मनःपूर्वक शुभेच्छा 🙏

🙏धन्यवाद 🙏

सौ. रोहिणी राजेंद्र लोखंडे
शाळा नांदूर  केंद्र -खामगाव ता. दौंड
जि. पुणे


निसर्गरंग
मासे कधी झोपतात का?
सुरवंटाचे पाय एकमेकात अडकत कसे नाहीत ?
मुलांना पडणाऱया अशा भन्नाट प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी तेर पॉलिसी सेंटर आणि पॅरामाउंट डिजिकॉमने “निसर्गरंग” हे ऑनलाइन मराठी पाक्षिक सुरु केलय. निसर्गरंगमधून पर्यावरण क्षेत्रातील संशोधक ताईदादा मुलांशी संवाद साधणार आहेत.
लॉकडाउनमुळे घरात अडकलेल्या मुलांसाठी नक्कीच हा उपक्रम बौद्धिक आणि पौष्टिक खाद्य ठरेल ! मुलांना मराठी वाचायला प्रोत्साहन द्या नाही तर तुम्ही त्यांना वाचून दाखवा..
चला तर मग निसर्गरंगचे सभासद होण्यासाठी  www.nisargaranga.com इथं क्लिक करा!
निसर्गरंगच्या कुटुंबामध्ये तुमचे स्वागत आहे.
https://wa.me/c/919420781938

No comments:

Post a Comment